
राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा संध्याकाळी थंडावल्या. त्यानंतर उमेदवारांकडून जाहीर प्रचार बंद करण्यात आला. प्रचाराची मुदत संपल्यानंतर छुपा प्रचार करण्यात येतो.
मात्र, पुण्यात उघडपणेच छुपा प्रचार सुरू असल्याचे दिसून आले आहे. काही उमेदवारांकडून सांकेतिक शब्दांचा वापर करत निवडणूक प्रचार सुरू असल्याचे समोर आले आहे.
निवडणूक आचारसंहितेनुसार, प्रचाराची मुदत संपल्यानंतर कोणत्याही स्वरुपात प्रचार करता येत नाही. त्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार करता येत नाही. निवडणूक आयोगाच्या नियमात असलेली पळवाट शोधण्यात काही उमेदवार यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. ही पळवाट इतकी भारी आहे की, उमेदवार-पक्षांनी थेट होर्डिंग झळकवले आहेत.
पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू आहे. उमेदवारांकडून टॅगलाईनचा वापर करत फ्लेक्स, होर्डिंगच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. प्रचाराची वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा उमेदवारांकडून सांकेतिक प्रचार अजूनही सुरूच असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार काल, सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच राज्यातील उमेदवारांना प्रचार करण्याची परवानगी होती.
मात्र, आज पुणे शहरातील अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून अप्रत्यक्षपणे प्रचार केला जात असल्याचे समोर आले आहे.शहरातील अनेक ठिकाणी लागलेल्या या फ्लेक्सवर निवडणूक आयोग काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
660 कोटींच्या वस्तूंवर टाच
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत आतापर्यंत 660 कोटी रुपये किमतीच्या वस्तूंवर टाच आणण्यात आली. यामध्ये बेकायदा मद्य, सोनं-चांदी, अमली पदार्थांचा समावेश आहे. 2019 च्या तुलनेत हा आकडा जवळपास पाच पट अधिक आहे. 2019 मधील निवडणूक काळात 122 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली.