
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे डहाणूमधील अधिकृत उमेदवाराने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी यांच्या पक्ष प्रवेशाने बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
विरारमध्ये पैसे वाटपावरून गोंधळ सुरु आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला. या आरोपानंतर विरारमध्ये एकच गोंधळ उडाला. हितेंद्र ठाकूर यांनीही या प्रकरणावरून विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केला. मात्र, विनोद तावडे यांनी या आरोपाचं खंडन केलं. या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु असताना बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलं आहे. डहाणू विधानसभा आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश पाडवी यांनी डहाणू विधानसभेचे भाजप उमेदवार विनोद मेढा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी माघार घेत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पाठिंबा जाहीर केला आहे. सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आदल्यादिवशी भाजपमध्ये पुन्हा घर वापसी केली आहे.
मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं
दरम्यान, डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विनोद भिवा निकोले आहेत. डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. निकोले यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदा विजय मिळवला होता.
यंदा निकोले यांना महाविकास विकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर त्यांच्या विरोधात भाजककडून विनोद मेढा रिंगणात उभे आहेत. तर बहुजन विकास आघाडीकडून सुरेश पाडवी रिंगणात होते. मात्र, मतदानाच्या आदल्यादिवशी सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय समीकरण बदललं आहे.