
महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिले असले तर मुख्यमंत्रीपदावरून सध्या घोडं अडलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात असलेला हाच तिढा सोडवण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार काल दिल्लीला गेलेले होते.
रात्री दिल्लीमध्ये अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक झाली. काल झालेल्या बैठकीतला एक फोटो समोर आला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या फोटोमध्ये अजित पवार, प्रफुल पटेल, जेपी नड्डा, सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य असल्याचं दिसलं. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसत होती. हा फोटो समोर आल्यापासून दिवसभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अखेर काळजीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच त्यावर स्पष्टीकरण दिले आणि चर्चांना पूर्णविराम दिला,
अमित शहांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर भेटीचा फोटो समोर आला. या फोटमध्ये फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य तर एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर एकनाथ शिंदे नाराज आहेत का? याबाबतच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. मात्र नाराज वगैरे काहीही नाही, मी खुश आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिली.
पडलेल्या चेहऱ्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे म्हणाले, कधी माझा चेहरा हसरा, कधी गंभीर काय काय आहे हे आता तुम्हीच ठरवा… अरे बाबांनो आजही मी खूश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एवढे बहुमत मिळाले नव्हते याचा अर्थ काय तर जनता सरकारवर खूश आहे. सरकारच्या कामाबाबत जनता समाधानी आहे यातच आमचे समाधान आहे.
एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
दिल्लीतील भेटीनंतर आज महायुतीच्या तीनही नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक होणार होती. परंतु महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस महायुतीची ही बैठक होणार नसून महाराष्ट्र भाजप गटनेता निवड झाल्यावर महायुतीची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगाव देरे सातारा येथे जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.