
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट आहे, मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप स्पष्ट झालेले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं नाव सध्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
शिवसेना पक्षाने एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. मात्र भाजपने अजूनही त्यांच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली आहे. देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार असले तरी निवडीला होत असलेल्या विलंबामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र येत्या 5 डिसेंबरपर्यंत महायुती सरकारचा संपूर्ण कार्यक्रम पूर्ण होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
कसा असेल कार्यक्रम?
महायुती सरकारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर त्याआधी पक्षाचा विधिमंडळ गटनेता निवडावा लागणार आहे. 2 किंवा 3 डिसेंबरला भाजप विधीमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री निवडीला उशीर का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रम ठरले असल्याने 2 ऐवजी 5 डिसेंबर तारीख मुख्यमंत्री शपथविधी सोहळा आझाद मैदानात पार पडणार आहे. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री इतर व्हीआयपी तसेच धर्मगुरू यांना खास निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.