
शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ), प्रमुख अजितदादा पवार यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर चांगलीच चर्चा रंगली आहे. अजितदादा महायुतीत नसते, तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.
याला राष्ट्रवादीचे ( अजितदादा पवार ) आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गट नसता, तर आमचेही 100 आमदार निवडून आले असते. मात्र, चांगल्या निर्णयांचं फलित महायुतीला मिळालं आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “गुलाबराव पाटील आणि शिंदे गट सोबत नसता, तर आमचे 100 आमदार निवडून आले असते. पण, शेवटी तिघांनी मिळून लाडकी बहीण, ओबीसी आणि शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले. चांगल्या निर्णयांचं फलित महायुतीला मिळालं. त्यात एक पक्ष असता, तर त्यालाही फायदा झाला असता. चांगल्या निर्णयाचा हा परिपाक आहे. “