
सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२१, २२, २३ फेब्रुवारी २०२५ या काळात दिल्लीला होणार आहे. जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत.
जवळपास 70 वर्षांनी पुन्हा एकदा दिल्ली मराठी साहित्य संमेलनासाठी सज्ज होणार आहे. दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे.
पंडित नेहरू होते उद्घाटक
यापूर्वी १९५४ साली विल्लीला ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही
दिल्लीतील या कार्यक्रमात मा. एकनाथ शिंदे, मनसेचे नेते मा. राज ठाकरे, मा. नितीन गडकरी यांचे नाव देखील निमंत्रितांमध्ये आहे. याशिवाय अजित पवार, मा. मुरलीधर मोहोळ, मा. चंद्रकांतदादा पाटील आणि मा. विनोद तावडे यांचे सहकार्यही या संमेलनाला लाभले आहे. शरद पवार यांनी यापूर्वी औरंगाबाद (२००४), नाशिक (२००५), चिपळूण (२०१३) आणि सासवड (२०१४) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे तर १९९० साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही. पण राजधानी दिल्लीत होणाऱ्या पहिल्या साहित्य संमेलनाला साहित्यिक राजकीय सामाजिक अभ्यास असणारा माणूस राहावा म्हणून सरहद संस्थेने शरद पवारांना विनंती केली होती. या विनंतीला मान देत शरद पवार यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारल्याचे समोर येत आहे.