
शपथविधीचा मुहूर्त काढूनही सत्तावाटपाची अंतिम चर्चा झाली नसल्याने महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्याने भाजपचाच मुख्यमंत्री होणार आणि फडणवीस शपथ घेणार, हे निश्चित आहे.
मात्र महत्त्वाच्या खात्यांवरून महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रचंड स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत अजित पवार सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाला आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशिवाय प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत अजित पवार अमित शाह यांना भेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांशी अमित शाह यांच्याशी गत सप्ताहात चर्चा झाली. मुख्यमंत्रिपदावर कोणतीही चर्चा न करता भाजपकडेच सत्तेच्या चाव्या राहतील, हे स्पष्टपणे वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केले. त्यामुळे गृह, अर्थ, नगरविकास, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम अशी महत्वाची खाती मिळविण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत चढाओढ लागली आहे.
आधी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर घटवली, आता महत्वाच्या खात्यांसाठी थेट भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आधीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देऊन शिवसेनेची वाटाघाटीतील शक्ती (बार्गेनिंग पॉवर) कमी केली होती. त्यामुळे साहजिक भारतीय जनता पक्षाला बळ मिळाले. आताही अमित शाह यांच्याशी वैयक्तिक भेटून महत्त्वाची खाते मिळविण्यासाठीचे नियोजन अजित पवार यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जाते. ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सोबतीने अजित पवार आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी घेतील.
शिंदे-भाजपमध्ये काहीसा अबोला, अजित पवार दिल्लीला रवाना
सत्तावाटपाचे अंतिम सूत्र ठरविण्यासाठी अमित शाह यांनी मुंबईत बैठक घ्यावी, अशा सूचना दिलेल्या होत्या. परंतु एकनाथ शिंदे यांच्या आजारपणामुळे आणि ते मूळगावी गेल्याने महायुतीची बैठक होऊ शकलेली नाही. त्यातच शिंदे यांनी गृहमंत्रिपदाची मागणी जोरदारपणे लावून धरल्याने भाजपही ताणण्याच्या बेतात आहे. अजित पवार यांच्या पक्षाची मात्र फार तनातनी न करता अर्थ, सार्वजनिक बांधकाम, कृषि अशी महत्त्वाची खाती पददार पाडून घेण्याची रणनीती आहे.