
विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर अखेर महायुतीने राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तत्पूर्वी, भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.
पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे अखेर ठरले आहे. अशातच उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा. हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे. उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा. भाजपाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात. तसे आपणही तळागाळात जाऊन काम केले पाहिजे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू, तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा.
१८ निरीक्षकांना नेमून प्रत्येकी १२ प्रभागांची चाचपणी करा आणि त्या अनुषंगाने अहवाल सादर करा. बीएमसी निवडणुकांपर्यंत भाजपा एकनाथ शिंदेंना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजपा आपले खरे रुप दाखवेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS चा आव आणून त्याखाली भाजपाने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रके वाटण्यापुरती होती. सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपाची मोठी शक्ती आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई महापालिका जिंकायचीच आहे. लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावले जाणार आहे. मुंबईतील गट प्रमुखांचेही शिबिर घेणार आहे, अशी माहिती, सूचना आणि आदेश उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर आता योग्य सन्मान झाला असता
जब चिड़िया चुग गई खेत तब पछताए तो क्या फायदा. कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेसच्या बरोबर गेलात तर दुकान बंद होईल. मग आपल्या वडिलांचे ऐकायचे नाही असे कोणी ठरवले असेल तर काय करायचे? जर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी विश्वास घात केला नसता तर आता त्यांचा सन्मान कायम राहिला असता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने सन्मान झाला असता, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आता उफाळलेले प्रेम चार ते पाच वर्षांपूर्वी उफाळले असते, तर कदाचित एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून कधी बाहेर पडले नसते. ज्या पद्धतीने कार्यकर्ते, आमदारांचा अपमान, मंत्र्यांचा अपमान, एकनाथ शिंदे यांचा अपमान सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केला, त्यामुळे हिंदुत्वाचा बंड झाला आणि खरी शिवसेना घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता कोणता विषय राहिलेला नाही. कार्यकर्त्यांना जागे ठेवायचे असेल, तर बैठका घ्यावा लागतात. परंतु, आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, या शब्दांत प्रसाद लाड यांनी निशाणा साधला होता.