
केज पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालिन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला न्यायालयाने नऊ दिवसांची (ता.२७ डिसेंबर पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फरार संशयित वाल्मिक कराड याचा शोध पोलिस घेत आहेत. ता. ११ डिसेंबरला केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
आहे त्या स्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, काम सुरु केले तर याद राखा’ अशी धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागत मागणी पुर्ण करा, अथवा तुमचे हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावेल, अशी धमकी दिल्याची फिर्याद आवादा एनर्जी प्रकल्पाचे मस्साजोग (ता. केज) येथील सुनिल केदू शिंदे यांनी केज पोलिस ठाण्यात दिली होती.
यावरुन मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडसह राष्ट्रवादी काँगेसचा तत्कालिन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व सुदर्शन घुलेवर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाला होता. यातील विष्णू चाटे व सुदर्शन घुले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खुन प्रकरणातही आरोपी आहेत.
दरम्यान, सरपंच देशमुख यांचे अपहरण व हत्या ता. नऊ डिसेंबरला घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या विष्णू चाटेला बुधवारी (ता. १८) पोलिसांनी बीडजवळ ताब्यात घेतले. त्याला सध्या खंडणी प्रकरणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
त्याला गुरुवारी (ता. १९) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे. त्याच्या अटकेची सर्वत्र मागणी होत आहे. अधिवेशनातही हा मुद्दा गाजत आहे.