मोहिनी वाघचे पतीवर गंभीर आरोप, चौकशीत काय सांगितलं..?
भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. अपहरणानंतर धावत्या गाडीत सतीश वाघ यांच्यावर तब्बल ७२ वार करून त्यांचा जीव घेण्यात आला.
यानंतर मारेकऱ्यांनी लोणी काळभोरच्या घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह टाकून पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी २४ डिसेंबरला मोठा खुलासा केला होता. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघनेच अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी तपासातून उघड केली होती.
शेजारी राहणाऱ्या अक्षय जावळकर याच्यासोबत मोहिनीचे अनैतिक संबंध होते. यातूनच मोहिनेने अक्षयला पाच लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मोहिनी वाघने आपल्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. हा सर्व त्रास असह्य होता, असा गंभीर आरोप सतीश वाघ यांच्या आरोपी पत्नी मोहिनी वाघने केली आहे
शुक्रवारी झालेल्या पोलिसांच्या चौकशीत मोहिनीने हा आरोप केला आहे. याबाबतची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे. याप्रकरणी मोहिनी वाघसह सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मोहिनी वाघ आणि तिचा प्रियकर अक्षय जावळकर यांची समोरासमोर चौकशी देखील करायला सुरुवात केली. यावेळी हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार आरोपींनी भीमा नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस पुरावे गोळा करत आहेत.
सतीश वाघ हत्येचा घटनाक्रम
9 डिसेंबर 2024
सकाळी 6:30: सतीश वाघ नेहमीप्रमाणे घराजवळ मॉर्निंग वॉक गेले असता त्यांचे अपहरण करण्यात आले.
सकाळी 7:00: एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना पाहून वाघ यांच्या कुटुंबाला आणि स्थानिकांना कळवले.
सकाळी 8:30: हडपसर पोलिस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली आणि तपास सुरू झाला.
सकाळी 9:00: गुन्हे शाखेचे पथकही तपासासाठी पाचारण करण्यात आले.
दुपारी 12:00: सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल टॉवर लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी तपासात प्रगती केली.
सायंकाळी 6:00: शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला.
रात्री 8:00: फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला.
11 डिसेंबर 2024
संशयितांची चौकशी: पोलिसांनी 8-10 संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली.
24 डिसेंबर 2024
मुख्य आरोपी अटक: सतीश वाघ यांचे माजी भाडेकरू अक्षय जावळकर याला धाराशिवमधून अटक करण्यात आली.
25 डिसेंबर 2024
तपासादरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ हिने पतीच्या हत्येचे कटकारस्थान रचल्याचे समोर आले. अक्षय जावळकर यानेच याचा कबुली जबाब दिला.
