मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला जनतेनं तुफान प्रतिसाद दिला.
यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. यात भाजपचे नेते सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना टार्गेट करत ते बोगस मतांनी निवडून आल्याचा दावा केला. तसंच पंकजा मुंडे यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं.
धस म्हणाले, बीड जिल्ह्यात धनुभाऊ १ लाख ४२ हजार मतांनी निवडून आल्याचं सांगता पण शाई एकानं लावायची आणि ३३० बुथपैकी २३० बूथ जर ताब्यात असतील तर? बोगस…बोगस मतांवरची तुमची निवडणूक आहे. राजासाहेब देशमुख इथं आहेत मतदानाच्या दिवशी यांना बदडलं, अॅड. माधव जाधवला बदडलं, कुठेही गेलात तरी तुम्ही गोळीबार करता. बाराशे-तेराशे बंदुकीचं लायसन्स बीड जिल्ह्यात दिली आहेत. ही लायसन्स ज्या कलेक्टरनं दिलीत, ज्या पोलीस अधीक्षकांनी आणि ज्या डीवायएसपींनी त्याला मान्यता दिली या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.
आमच्या पंकुताईंना तुम्ही संभाजीनगरला एअरपोर्टवर उतरलात. १२ डिसेंबर हा गोपिनाथ मुंडेंच्या जयंतीचा दिवस होता पण वाकडी वाट करुन तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का गेला नाहीत? का फक्त कोरडं बोलायचं का? धनुभाऊ तुम्ही गोपिनाथ गटावर जे बोललात त्याचा काय उपयोग? गोपिनाथ मुंडेंनी मुंबईतलं गँगवार संपवलं, इतके मोठे होते ते. पण पंकुताई तुम्हाला चांगली माणसं कळत नाहीत. तुम्हाला फक्त जी हुजूर जी हुजूर करणारी माणसं पाहिजेत.
पण आम्ही तुमच्या पुढे जी हुजूर करणार नाही, भलेही राजकारणातून बाहेर जाऊ. पण तुम्ही संतोष देशमुखच्या घरी तुम्ही यायला पाहिजे होतं याचं उत्तर द्या किंवा देऊ नका पण. तुम्ही भेटायलाच नाही आलात तर काय अपेक्षा ठेवायची, पण तुमच्याकडून अपेक्षा होती.
