महाराष्ट्र हाउसिंग अँड डेव्हलपमेंट अॅथोरिटी अर्थात म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजीव जैस्वाल यांनी आपल्या काही सुरक्षा रक्षकांच्या मदतीने या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली आहे.
विजय चाळके असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव असून तो पोलीस उपनिरीक्षक होते. 26 डिसेंबर रोजी त्यांना मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी २६ डिसेंबरला निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके १२ जणांसोबत म्हाडा कार्यालयात गेले होतो. त्यांना संजीव जैस्वाल यांची भेट घ्यायची होती. म्हाडा पुर्नविकासात गेलेल्या घराचं भाडं न मिळाल्याने तक्रार करण्यासाठी ते जैस्वाल यांच्या भेटीला गेले. मात्र यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर संजीव जैस्वाल यांनी आपल्या १० ते १२ सुरक्षा रक्षकांच्या मदतीने चाळके यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर जैस्वाल यांनी मारहाण करत असताना विजय चाळकेंना एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. मुंबई पोलीस आयुक्तांना सांगून तुझं एन्काऊटर करेन आणि तुझी पेन्शन बंद करेन, अशी धमकी जैस्वाल यांनी दिल्याचा आरोप चाळके यांनी केला. तसेच जैस्वाल यांनी गळ्यातील चैन आणि हेडफोनही तोडल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणी चाळके यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वालसह इतर १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाडाचे उपाध्यक्ष संदीप जयस्वाल आणि निवृत्ती पोलीस उपनिरीक्षक यांच्यात वाद झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीतून ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे. आता या वादातून म्हाडाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याबद्दल म्हाडा कडून लेखणी बंद आंदोलन करण्यात येत आहे . या आंदोलनात म्हाडाचे सर्वच कर्मचारी उपस्थित आहेत.
