
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झालेली नाही. तसेच संकेत त्यांच्या निकटवर्ती यांनी दिले आहेत. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय अडचणी वाढविण्यासाठी भुजबळ प्रयत्नशील आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या शिर्डी येथे होत आहे. या दोन दिवशीय बैठकीला पक्षाचे सर्व आमदार खासदार पदाधिकारी आणि पाचशे निमंत्रित सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आगामी राजकीय वाटचालीचा आढावा घेतला जाईल.
माजी मंत्री भुजबळ मात्र या बैठकीकडे पाठ फिरविणार आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांच्या राजकीय अडचणी वाढविण्यासाठी माजी मंत्री छगन भुजबळ प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी मंत्री भुजबळ यांची सध्या भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढती जवळीक आहे. भारतीय जनता पक्षाकडूनही त्याबाबत अनेकदा संकेत देण्यात आले आहे. त्यामुळे माजी मंत्री भुजबळ भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल असे बोलले जाते.
गेले दोन दिवस पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी श्री भुजबळ यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्री भुजबळ यांनी अद्याप कोणालाही प्रतिसाद दिलेला नाही. असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात देखील भुजबळ यांची राजकीय दिशा काय असेल, हे स्पष्ट होते.
शिर्डी येथे होणाऱ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत सदस्य नोंदणी आणि पक्षाच्या विस्तारासाठी मोठा निर्णय घेतला जाईल. अशा स्थितीतच माजी मंत्री भुजबळ हे मंत्री पद नाकारल्याने नाराज असल्याचे संकेत वारंवार देत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांचे हे डावपेच किती यशस्वी होतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.