
मंत्रिपदावरून डावलल्यानंतर पक्षाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दरी आता अधिकच वाढली आहे. मुंबईत झालेल्या आमदारांच्या बैठकीत गैरहजर राहिलेले भुजबळ शिर्डी येथे शनिवारपासून होणाऱ्या पक्षाच्या दोन दिवसीय शिबिरात देखील सहभागी होणार नसल्याची माहिती पुढे आली आहे
भुजबळ भाजपच्या वाटेवर असून, त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि भुजबळ यांच्यातील शीतयुध्द आता चांगलेच भडकले आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्या गेल्यानंतर नाराज असलेल्या भुजबळ यांनी ‘जहाँ नही चैना, वहा नही रहना’ असे जाहीरपणे सांगत राष्ट्रवादीशी काडीमोड घेण्याचे संकेत दिले होते. येवला आणि त्यानंतर नाशिकमध्ये समता परिषदेचा मेळावा घेत राज्यभरात ओबीसी एल्गार पुकारण्याचा निर्णय जाहीर करत अजित पवार यांना थेट इशाराच दिला होता. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीच्या शिखर नेत्यांकडून भुजबळ यांच्या मनधरणीसाठी आवश्यक प्रयत्न केले न गेल्यामुळे भुजबळ यांची नाराजी अधिकच वाढली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपच्या वाटेवर असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला होता. फडणवीस यांनी त्यावेळी भुजबळ यांना काही दिवस संयम पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर भुजबळ सहकुटुंब परदेशात रवाना झाले होते. परदेशातून परतल्यानंतर भुजबळ स्वस्थ बसले नाहीत. राजकीय पातळीवर त्यांच्या हालचाली सुरूच होत्या. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या बैठकीबरोबरच बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमदार भेटीच्या बैठकीतही भुजबळ सहभागी झाले नव्हते. भुजबळ मुंबईत असूनही ते या कार्यक्रमांना अनुपस्थित राहिल्याचा अर्थ भुजबळ यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येते.
प्रदेशाध्यक्षांकडून भुजबळांशी चर्चा
शनिवारी व रविवारी राष्ट्रवादीची शिर्डी येथे बैठक होत आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी भुजबळांशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याला भुजबळ यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे वृत्त आहे. या साऱ्या घडामोडींतून भुजबळ राष्ट्रवादी सोडणार हे आता अधोरेखित होऊ लागले आहे.