
आदिती तटकरे म्हणाल्या…
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील आर्थिक मागास महिलांना दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जातो. या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी निकष लावले जाणार आहेत. तसेच ज्या महिला अपात्र ठरणार त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल करणार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय म्हणाल्या आदिती तटकरे ?
आदिती तटकरे यांना अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर भाष्य करताना आदिती तटकरेंनी सांगितले की, ‘लाडकी बहीण योजनेत दिलेले पैसे परत घेण्याचा कोणताही विचार नसला तरी यापुढे निकषात बसणाऱ्या लाभार्थी महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.’
पुढे बोलताना आदिती तटकरेंनी सांगितले की, ‘लाभार्थी महिलांकडून परस्पर पैसे परत घेणार नाही, परंतु जर तुम्ही निकषात बसत नसाल तर स्वतः हून पैसे परत करावेत, असं आमचे आवाहन आहे. पैसे करत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकली आहे. अनेक महिलांनी आम्हाला पैसे परत केले आहेत. या योजनेत नव्याने कोणतेही निकष तयार केले जाणार नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना हप्ता दिला जाईल असंही आदिती तटकरेंनी सांगितले.
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन अर्ज
आधार कार्ड
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य).
बँक पासबूक
पासपोर्ट आकाराचा फोटो
रेशनकार्ड
सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र