
कोर्टाचा निर्णय येताच धनंजय हात जोडत म्हणाले...
आवादा कंपनीतील खंडणी आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितल्याने बीड मकोका विशेष न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
वाल्मिकला जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी जामीन मिळविण्यात त्याला यश येणार नाही, असे सांगितले जाते. वाल्मिकला न्यायालयीन कोठडी मिळताच पीडित देशमुख कुटुंबाने चिंता व्यक्त केली.
आरोपींची प्रचंड दहशत, कुटुंबाला चिंता, जामीन मिळाला तर..
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपींची साखळी आहे. प्रचंड दहशतीतून यांनी गुन्हेगारी कृत्ये केली आहेत. आज जरी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग राहू नये, अशी विनंती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली.
आरोपींना सोडले जाणार नाही, फाशी दिली जाईल, असे सरकार आम्हाला सांगत असले तरी अटकेत असलेल्या एकेका आरोपींवर १०-१५ गुन्हे दाखल आहेत. त्यांना जर जामीन दिला आणि एकत्रित मिळून त्यांनी पुरावे नष्ट केले तर काय करणार? असा नेमका सवाल धनंजय देशमुख यांनी विचारला.
आरोपींना अभय दिले तर समाजाने नेमका काय संदेश घ्यायचा?
या प्रकरणातील मुख्य आरोपी (वाल्मिक कराड) केजला चाटे यांच्या कार्यालयात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज काल प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मी पाहिले. तसेच त्यांच्यासोबत एक पोलीस अधिकारीही होते. गुन्हेगारी संपली पाहिजे. कायद्याचे राज्य आले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणे हे पोलिसांचे काम आहे. पण पोलिसच आरोपींसोबत फिरत असतील तर मग आम्ही कुणाकडे जायचे? समाजाने काय संदेश घ्यायचा? असे प्रश्नही देशमुख यांनी विचारले.
...नाहीतर चौकशीचा केवळ फार्स होईल
शासनाने खंडणी आणि हत्या प्रकरणात चौकशी समित्या नेमल्या आहेत. त्या काम करतायेत, आम्हीही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे ऐकतो आहे पण गुन्हेगारी संपली पाहिजे हा निश्चय सर्वांनी मिळून केला पाहिजे. नाहीतर केवळ चौकशीचा फार्स होईल, असे धनंजय देशमुख म्हणाले.