
दमानियांनी धनंजय मुंडेंचा कट्टाचिठ्ठाचं काढला
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असून या प्रकरणावरून विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे.
तर या प्रकरणात अंजली दमानिया देखील आरोपींविरोधात पाठपुरावा करताना दिसत आहे. या प्रकरणात आज त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आणि बीडमधील परिस्थितीची माहिती दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मी बीडची सत्य परिस्थिती सांगितली तिथे किती दहशत आहे हे त्यांना सांगितलं तसेच धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची माहिती दिली. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, टर्टल्स लॉजिस्टिक लिमिटेड या दोन कंपन्यामध्ये धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे आहेत आणि यात वाल्मिक कराडही भागीदार आहे. पण या दोन कंपन्यांना महाजेनकोचे कंत्राट कसे मिळाले? महाजनकोकडून धनंजय मुंडे यांना जो लाभ मिळतोय तो ऑफिस ऑफ प्रॉफिट असून असं आमदार खासदाराला हे करता येत नाही.
लोकप्रतिनिधीला नियमाप्रमाणे लाभाचे पद घेता येत नाही. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द होऊ शकते असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, वाल्मीक कराडची पोलीस कोठडी इतक्या लवकर संपली कशी? कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे पण तरीही त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली तसेच विष्णू चाटे या आरोपीलाही त्याच्या मागणीनंतर लातूर कारागृहात ठेवण्याचा पर्याय दिला गेला. हे चुकीचे आहे. असं देखील माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या.