अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला अटक झाली आहे. खंडणीच्या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक झाली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपात अटक झाली आहे.
अडीच कोटीची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने कारवाई केलीय. डी के राव आणि सहा जणांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. डी के रावला 2017 सालच्या खंडणीच्या गुन्ह्यात 2022 साली हायकोर्टाकडून जामीन मिळाला होता. डी के राव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. डी के राव पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
डी के राव हा मुंबईतील कुख्यात गँगस्टर आहे. त्याचा मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. खंडणी, दरोडा आणि अन्य गुन्हेगारी कारवायांमध्ये याआधी सुद्धा त्याला अटक झाली आहे. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात छोटा राजनचा खास हस्तक अशी डी के रावची ओळख आहे. मुंबईतील बिझनेसमन, बिल्डर्सना खंडणीसाठी धमकावल्याचे आरोप त्याच्यावर झाले आहेत. विविध गुन्ह्यांखाली त्याला अनेकदा अटक झाली आहे.
छोटा राजनचा राईट हॅन्ड
एफआयआर नोंदवण्यात आला असून डीके रावसह सर्व सात आरोपींना अटक झाली आहे. पुढील तपास सुरु आहे. डी के राव हा दिलीप मल्लेश वोरा नावाने सुद्धा ओळखला जातो. मुंबईच्या माटुंग्यात जन्मलेल्या डी के रावच बालपण झोपडपट्टीमध्ये गेलं. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मोठा झाल्यानंतर चुकीची संगत लागली. चोरी आणि लुटमारी सारख्या गुन्ह्यांमध्ये तो सहभागी झाला. त्यानंतर तो छोटा राजन टोळीत सहभागी झाला. बँकेत दरोडा, मोठ्या व्यावसायिकांची हत्या अशा गुन्ह्यांमध्ये डी.के.रावच नाव आलं. हळू हळू राव छोटा राजनचा राईट हॅन्ड झाला.
छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन वसुली करायचा
छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन डी के राव बिल्डर्सकडून वसुलीची कामे करायचा. कोणी नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. अनेकदा तो तुरुंगात गेला. तिथून सुटल्यानंतरही तो असेच गुन्हे करत राहिला. म्हणून पुन्हा एकदा त्याला खंडणीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.


