
‘ऑपरेशन टायगर’वर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही खासदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा केला आहे.
त्यांनी दावोस दौऱ्यावर असताना हा दावा केला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होऊ शकतो, अशा चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे गटाचे सहा खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असं बोललं जातंय. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन टायगर’ असं नाव दिल्याची देखील माहिती आहे.
विशेष म्हणजे आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशीच हा पक्षप्रवेश होणार होता, मात्र कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर ठाकरे गटाच्या सहा खासदारांचा शिंदे गटात पक्षप्रवेश होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. या सगळ्या घडामोडींवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
जेव्हा एकनाथ शिंदे दाढीला हात लावतात, तेव्हा काही ना काही करतात. ते कधी काय करतील, आम्हालाच कळत नाहीये, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आहेत, त्यामुळे त्यांच्यात गप्पा होतात, असंही राऊत म्हणाले.
ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे?
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी २१ जागा लढवत ९ खासदार निवडून आणले होते. आता यातील ६ खासदार फुटणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा मतदारसंघातील कामं करता यावीत, त्यामुळे हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. अमित शाह यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आणि कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर हे सहाही खासदार एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा आहेत.