
ट्रोलर्सना बहिणीने दिलं सडेतोड उत्तर..!
अभिनेता सैफ अली खान 16 जानेवारी रोजी त्याच्या वांद्रे इथल्या राहत्या घरात एका चोराने चाकूहल्ला केला. चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार गंभीर स्वरुपाचे होते. लिलावती रुग्णालयात सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.
इतकंच नव्हे तर त्याच्या मणक्याजवळ रुतलेला अडीच इंचाचा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी सर्जरीदरम्यान काढला. उपचाराच्या पाच दिवसांनंतर 21 जानेवारी रोजी त्याला डिस्चार्ज दिला. घरी परतताना सैफ व्यवस्थित चालत-बोलत दिसल्याने त्यावरून काही जणांनी प्रश्न उपस्थित केले. इतके गंभीर वार झाल्यानंतरही सैफ इतका लवकर कसा बरा झाला, असे प्रश्न काहींनी विचारले. त्यावर आता सैफची बहीण सबा पतौडीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
सबा पतौडीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘स्वत:चं ज्ञान वाढवा.’ कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर दीपक कृष्णमूर्तीची पोस्ट सबाने शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितलंय की, मणक्याच्या सर्जरीनंतरही त्यांची 78 वर्षीय आई आरामात चालू-फिरू शकत होती. ‘ज्या लोकांची कार्डियॅक बायपास सर्जरी झाली, ते तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पायऱ्यासुद्धा चढू शकतात. स्वत:ला शिक्षित करा’, असा टोमणा त्यांनी या पोस्टमध्ये लगावला होता. सबा पतौडीने हीच पोस्ट तिच्या अकाऊंटवर शेअर करत सैफच्या रिकव्हरीबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सुनावलं आहे.
सैफला डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी प्रश्न उपस्थित केला होतता. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट कसा, असा सवाल त्यांनी केला होता. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘डॉक्टरांनी म्हटलं होतं की सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच आतमध्ये चाकू घुसला होता. कदाचित तो चाकू आत अडकला असावा. सलग सहा तास शस्त्रक्रिया झाली. हे सर्व 16 जानेवारी रोजी घडलं. आज 21 जानेवारी आहे. रुग्णालयातून बाहेर पडताच सैफ इतका फिट? तेसुद्धा फक्त पाच दिवसात? कमाल आहे,’ असं ट्विट निरुपम यांनी केलं होतं.