
चालकाने मद्यपान केल्याचा दावा…
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
पिंपरी/ पुणे जिल्ह्यातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खासगी बस बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहरालगतच्या घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील मोशी येथील ४६ भाविकांना घेऊन एक खासगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ६ वाजता तुळजापूरकडे रवाना झाली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतले. यानंतर देवीचे दर्शन करून सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागले. मात्र, तुळजापूर शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत.
या जखमींना धाराशिवला हलवले…
शांताबाई बाबू बोराटे, चंदा शिंदे, विजया दीपक साबळे, सुजित बोके, विहान शिंदे, भावना नाखाले, उषा सुग्रीव शिंदे, लक्ष्मी धोत्रे, राणी फडतरे, आशा रामकरे, सारिका कुटे, बसचालक ज्ञानेश्वर बारस्कर, मारुती दसने, राधाबाई पतंगलाड, मंदाकिनी म्हेत्रे, स्वरीत अल्लाट, रूपाली गायकवाड, सुशीला बोराटे, कल्पना भारत शेळके, सुनीता अशोक भोर यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तुळजापुरात प्रथमोपचार करून धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर तुळजापुरातच उपचार सुरू आहेत.
चालकाने मद्यपान केल्याचा दावा…
या घटनेतील बसचालकाने मद्यपान केल्याचा दावा काही जखमींनी केला. तसेच रुग्णालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्याच्या खिशात मद्याची बाटली सापडल्याचा दावा केला आहे.
भाजपा कार्यकर्त्याचा उपक्रम…
अपघातग्रस्त बसमध्ये तसेच काही जखमींकडे दर्शनाचे पास सापडले आहेत. त्यावर आयोजक म्हणून मोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या सरिता तळेकर व योगेश तळेकर यांची फोटोसह नावे आहेत.