वारकरी संप्रदाय आक्रमक
संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी, वाल्मिक कराड गँगशी संबंध आदी मुद्यांवरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचे समर्थन करणारी भूमिका मांडली असून, याचा आम्ही निषेध करतो.
याप्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या आध्यात्मिक व वारकरी आघाडीने सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल आबा मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शास्त्री यांच्या भूमिकेचा निषेध करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पुणे जिल्हा अध्यक्ष हभप समाधान महाराज देशमुख यावेळी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीने नामदेव शास्त्रींना काही सवाल देखील केली आहे.
देशमुखांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे उत्तर बुवा देणार का?
संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांची मानसिकता तशी का बनली हे देखील पाहिले पाहिजे.. म्हणजे शास्त्री बुवा तुम्ही हत्येचे समर्थन करता का? शास्त्री बुवांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे उघड समर्थन केले, मग आरोपी फरार असताना शास्त्री बुवांनी त्यांना छुपा आश्रय होता का याची चौकशी का होऊ नये? दोन तास धनंजय मुंडेंशी चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेतली आणि दुःख झाले, तर संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचे उत्तर बुवा देणार का? धनंजय मुंडे गुन्हेगार नाही म्हणता, तर हार्वेस्टर घोटाळा, कृषी साहित्य घोटाळा, राख घोटाळा, वीमा घोटाळा, वाळूमाफिया, खंडणी वसुलने, जमिनी बळकावणे, गुन्हेगारी टोळी बनवणे, व्यभिचार करणे हे सदगृहस्थाचे लक्षण आहे? असा सवाल संतप्त सवाल देखील उपस्थित केला आहे.
तसेच धनंजय मुंडेंमध्ये संत दिसत असेल तर भगवानगडाचे महंतपद त्यांना देणार का? शास्त्री बुवा खुनी, भ्रष्टाचारी, खंडणीखोरांसाठी धावून आले, याचा अर्थ खंडणीतील वाट त्यांना मिळाला असे का समजू नये. दोन समाजाला समोरासमोर लढा असे सांगणे भगवानगडाच्या महंताला शोभते का? धनंजय मुंडेंची पार्श्ववभूमी गुन्हेगारीची नाही तर बीडमध्ये गुन्हेगारांची टोळी करून त्यांना बळ कोणी दिले? गावातील दलित बांधवांची बाजू घेऊन सरपंचांनी मध्यस्ती केली म्हणून हत्या केली. या न्यायाने हत्या झाल्यावर कोणते पाऊल उचलणे शास्त्री बुवांना अपेक्षित आहे? शास्त्री बुवा, पीडितांना न्याय देणे संस्कृती आणि गुन्हेगारांची पाठराखण करणे विकृती आहे. या न्यायाने तुमची मानसिकता विकृत नाही का? असे प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीत काय गैर आहे?
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन आकाची पाठराखण केली. राज्यातील गरजवंत मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्यावर मत व्यक्त करावे असे वाटले नाही का?
संतोष देशमुख यांची हत्या करणारे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय आहेत. धनंजय मुंडेचा इतिहास पाहता मंत्रीपदावर असताना त्यांचा तपासामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीत काय गैर आहे? धनंजय मुंडे सलाईन लावल्या हाताने भेटायला आले म्हणून हळहळ वाटली. मनोज जरांगे पाटील प्राणांतिक उपोषण करतात, संतोष देशमुख यांना हालहाल करून मारले तेव्हा तुमच्या पाषाण काळजाला वेदना का झाल्या नाहीत?
