
302 दाखल करा,अजित पवारांचा उल्लेख करत जरांगे कडाडले!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 160 कोटींच्या घोटाळ्यासह विविध आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर काही पुरावे देखील सादर केले.
दरम्यान मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी केली. मुंडेंनी मंत्रीपदावरून राहून पुरावे नष्ट केले आणि संतोष देशमुख खून आणि खंडणी प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर आम्ही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरू अशी संतापजनक प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.
दमानिया यांच्या पत्रकार परिषदेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे पहिल्यापासून घोटाळेबाज आणि लफडेबाज आहे, त्यांच्यावर 302 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा. तेच संघटीत गुन्हेगारी चालवत आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
मुंडेंवर आरोप करताना जरांगे म्हणाले, आपण कुणावर उगीच आरोप करत नाही, पण धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या जोरावर अधिकाराचा वापर करून पुरावे नष्ट करणं, आत बाहेर काही गोष्टी पुरवणं. यांच्या मनानुसार यांना तुरुंग मिळवणं, असे प्रकार केले जात आहेत. अद्याप तपासात आरोपी सापडत नाहीत. आरोपींच्या लिंक सापडत नाहीत. त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात नाहीयेत. अजित दादा तुमच्याकडे एकच म्हणणे आहे, धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या जोरावर बाहेर राहून पुरावे नष्ट करीत आहे. हे पुरावे नष्ट झाले, खंडणी आणि खूनातला एकही आरोपी सुटला तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरू.
धनंजय मुंडे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीवर देखील मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे यांच्यावर मोक्का लावून काय होणार, त्यांच्यावर थेट ३०२ चा गुन्हा दाखल करायला हवा. तेच संघटीत गुन्हेगारी घडवून आणताय. तेच या सगळ्यांचे मालक आहेत, असा आरोपही जरांगे यांनी केला.