
फलटण तालुक्यात वेगळीच राजकीय चर्चा?
नाईक निंबाळकर फलटणमधलं राजघराणं तालुक्यातलं मोठं प्रस्थ. फलटण तालुक्यात ज्यांची चलती असते किंवा फलटणमधलं राजकीय वारं जे ठरवतात ते म्हणजे नाईक निंबाळकर.
अशा नाईक निंबाळकरांच्या घरातच आज आयकरनं धाड टाकली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यावर धाड पडली आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत. आणि हे नेते म्हणजे अजित पवारांसोबत असूनही राजकीयदृष्ट्या सध्या अंतर ठेवून काम करणारे नेते रामराजे नाईक निंबाळकरांचे बंधू. पण भाऊ महायुतीतल्याच पक्षात असतानाही दुसऱ्या भावावर कारवाई होते. तर, आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात.
फलटण तालुका..सातारा जिल्ह्यातला महत्वाचा तालुका अन् विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनंही महत्वाचा मतदारसंघ. विधानसभेला इथून सचिन कांबळे पाटील निवडून आलेत तर लोकसभेला रामराजेंनी महाविकासआघाडीच्या पवारांचे उमेदवार अन् माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता. पण आता हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की आज सकाळपासून फलटणमध्ये मोठ्या घडामोडी घडताहेत. ते म्हणजे संजीवराजे नाईक निंबाळकर अन् रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरांवर छापेमारी झाली. त्यांच्या फलटणसोबतच पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवरही कारवाई झाल्याची माहिती आहे.
फलटणमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. तरी, महायुतीशी पटवून न घेणं नाईक निंबाळकरांना महागात पडताना दिसत असल्याची चर्चा आहे. कारण आज पहाटेपासून संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी छापेमारी सुरु आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर अन् रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे दोघेही माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरेंचे चुलत बंधू आहेत.
गोविंद दूध कंपनीतील व्यवहारासंदर्भात आयकर विभागाकडून चौकशी केली जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आयकर विभागाचं पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर सकाळी सहा पासून चौकशी करतंय. तरी, बंगल्यात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. खरंतर या कारवाईमागचं आयकर विभागाचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. आणि राजकीय कनेक्शन सांगायचं झालं तर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला होता. तर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
रामराजे नाईक निंबाळकर हे टेक्निकली अजित पवारांसोबत असले तरी विधानसभा निवडणुकीत ते कुठेच दिसले नाहीत. त्यांनी बाहेर पडून कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केला नाही. पण, विधानसभेला दीपक चव्हाणांसाठी बैठका घेतल्या अन छुपा पाठिंबा दिल्याचं बोललं गेलं. तर लोकसभेला रामराजेंनी उघड उघड धैर्यशील मोहितेंना पाठिंबा दिला होता. आता रामराजेसुद्धा पवारांसोबत जातील अशा चर्चा होत्या. कारण त्यासंदर्भात सूचक वक्तव्य खुद्द शरद पवारांनी इंदापुरात केलं होतं.
ज्यावेळी हर्षवर्धन पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी पवारांनी आपल्याला फलटणमध्येपण जायचंय अन् माढ्यातही जायचंय असं म्हटलं होतं. तर फलटण दौऱ्यावर असताना शरद पवार रामराजेंच्या भेटीलाही गेले होते. पण, रामराजेंनी अजूनही अधिकृतरित्या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही.
पुढचं राजकीय पाऊल काय?
आधी सांगितल्याप्रमाणे, रामराजे नाईक निंबाळकर हे टेक्निकली अजित पवारांसोबत आहेत. पण ते पक्ष कारवाईच्या भीतीनं कुठल्याही प्रकारे बाहेर पडून राजकीय भूमिका घेत नाहीत. कारण, अजित पवारांनी भाजपसोबत जाणं त्यांना पटलेलं नाही अशीही चर्चा स्थानिक पातळीवर आहे.
दुसरीकडे याच रामराजेंचे जवळचे कार्यकर्ते हे ना शरद पवार, ना अजित पवार तर थेट भाजपात पक्षप्रवेश करताहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं रामराजे अन् संजीवराजे हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी मोठं शस्त्र असतील यात काही वादच नाही. कारण, रामराजे विधिमंडळात म्हणजे विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा कार्यभार सांभाळत असताना इकडे फलटणमधलं राजकीय स्थैर्य संजीवराजेंनी टिकवल्याचं बोललं जातं. त्यामुळे विधानसभेआधी संजीवराजेंनी ठाम भूमिका घेत पवारांसोबत जाणं पसंत केलं पण आता रामराजेंची नेमकी भूमिका काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
आयकरच्या कारवाईवर, रघुनाथराजेंची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात, आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय.