करूणा शर्मांना घरी न्या अन्…
मुंबईतील वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठा निकाल दिला आहे. या निर्णयानुसार, धनंजय मुंडे यांना त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांना दरमहा १.२५ लाख रुपये आणि मुलगी शिवानी मुंडे हिला ७५,००० रुपये पोटगी द्यावी लागणार आहे.
या निर्णयावर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना घरी न्यावे आणि वाद संपवावा, असा थेट सल्ला दिला आहे.
ते म्हणाले, ‘धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना न्याय द्यावा, अन्यथा त्यांना कर्माची फळं भोगावी लागतील. त्यांच्या कौटुंबिक वादात आम्हाला पडायचं नाही, पण त्यांनी हा वाद मिटवून करुणा शर्मा यांना घरी न्यायला हवं.’
वांद्रे न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालात धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले काही आरोप अंशतः मान्य करण्यात आले आहेत. त्यामुळे पोटगीबाबत आदेश दिले गेले. मात्र, करुणा शर्मा यांनी १५ लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती, त्यामुळे त्या पुढील न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यावर घणाघात करत सांगितले, ‘करुणा शर्मा यांचा वनवास संपवला पाहिजे. जर त्यांनी न्याय मिळाला नाही, तर धनंजय मुंडेंना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील कौटुंबिक वाद राजकीय रंग घेत आहे. यात आता मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील उडी घेतल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना पक्षातून हाकलले पाहिजे अशी मागणी केली आहे. आता या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
