
कोयत्याने पत्नीच्या गळ्यावर-चेहऱ्यावर केले सपासप वार, कोल्हापुरला हादरवणारी घटना!
कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं शुक्रवारी मध्यरात्री धारदार कोयत्याने पत्नीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार केले आहेत.
या हल्ल्यात जागीच महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दीपक धावत्रे असं अटक केलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. तर मनीषा धावत्रे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. आरोपी दीपक हा यंत्रमाग कामगार असून तो आपल्या पत्नीसह इचलकरंजी शहरातील स्वामी मळा परिसरात वास्तव्याला आहे. मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी दीपक आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. याच कारणातून आरोपीनं पत्नीची निर्घृण हत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री दोन वाजता आरोपी दीपक आणि मनीषा यांच्यात वाद झाला. यावेळी आरोपीनं चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण केली. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीनं धारदार कोयत्याने पत्नीच्या मानेवर, तोंडावर आणि डोक्यावर वार केले. हा हल्ला इतका भयावह होता की, या हल्ल्यात पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला.
रात्री दोनच्या सुमारास हत्या केल्यानंतर आरोपी दीपक धावत्रे स्वत: शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने हत्येची कबुली देत स्वत:ला सरेंडर केलं. भल्या पहाटे हत्या करून आरोपी पोलीस ठाण्यात आल्यानंतर अर्धवट झोपेत असलेल्या ड्युटीवरील पोलिसांची झोप उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा दीपक विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.