राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाचच महिन्यात महाराष्ट्रात तब्बल 39 लाख मतदार वाढल्याचा दावा त्यांनी गेला आहे.
महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले होते, पण लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 5 महिन्यात 39 लाख मतदार वाढल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
शिवाय महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्या आणि एकूण मतदार यांच्यात तफावत आहे. लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या दोघांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
राहुल गांधींच्या आरोपानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहून टोला लगावला आहे. ‘जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते’, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत आहे. पराभवानंतर लोकांना सांगण्यासाठी राहुल गांधी नव्हं नरेटीव्ह सेट करत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असताना दिलेल्या प्रतिक्रिया फडणवीसांनी हे वक्तव्य केलं आहे.
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या निवडणुकांचा आम्ही अभ्यास केला. या निवडणुकांमध्ये आम्हाला अनियमितता आढळली. कारण महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले मग लोकसभेनंतर 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे आले? आम्हाला लोकसभा आणि विधाससभा निवडणुकीच्या मतदारांची यादी हवीय.
नाव, पत्ता आणि फोटोसहीत यादी द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे. 2019 आणि 2024 या पाच वर्षाच्या काळात आम्हाला 44 लाख मतदार महाराष्ट्रात वाढले. त्यानंतर लोकसभेची 2024 ची निवडणूक आणि विधानसभेची 2024 निवडणूक या काळात आम्हाला 39 लाख नवीन मतदार वाढले. हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येएवढे मतदार वाढले? त्यामुळे हे मतदार कोण आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
