
राजकीय हालचालींना वेग…
दिल्ली: राज्याच्या राजकारणात घडामोडी वेग घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीला अनेक राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. खासदारांची दिल्लीतील डिनर डिप्लोमसी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते झालेला सत्कार आणि शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांमुळे या भेटीकडे विशेष लक्ष लागले होते
नव्या कायद्यांवर चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेल्या गृहविभागाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. या वेळी नव्या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात या कायद्यांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, यासंदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती दिली. राज्यात न्यायवैद्यकीय पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात फॉरेन्सिक व्हॅन्सचा नेटवर्क उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील सहा महिन्यांत हे संपूर्ण नेटवर्क कार्यान्वित होईल. सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये घटनास्थळीच फॉरेन्सिक व्हॅन्स जाऊन पुरावे गोळा करतील. न्यायालयीन प्रक्रियेला वेग देण्यासाठी ऑनलाईन साक्षीदार प्रणाली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीची सुनावणी, तसेच पोलिस यंत्रणेचे तांत्रिक सक्षमीकरण यावरही भर दिला जात असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील
मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याच्या भारतात प्रत्यार्पणाला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मोदींचे आभार मानत, “आता मुंबई हल्ल्यातील शहिदांना न्याय मिळेल,” असे वक्तव्य केले.
तहव्वूर राणावर कडेकोट बंदोबस्तात नजर ठेवली जाणार असून, त्याला मुंबईतच ठेवले जाईल. याआधी अमेरिकेतून ऑनलाईन साक्षी मिळवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र त्यावेळी अमेरिका सहकार्य करण्यास तयार नव्हती. पंतप्रधान मोदींनी या मुद्द्याला पुढे रेटले आणि अखेर त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बातमी करण्यासारखे काही नाही – फडणवीस
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात वॉररूमच्या शेजारीच कोऑर्डिनेशन रूम तयार केली आहे, यावर विचारले असता, मी उपमुख्यमंत्री असताना तिथे आमचेच कार्यालय होते. आता ऑफिसच्या रिअलाईनमेंटचे काम सुरू आहे. ही फार मोठी घटना नाही, आमचे योग्य चालले आहे,असे फडणवीस म्हणाले.
कुंभमेळ्यासाठी प्रयागराज दौरा
दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराज येथे कुंभमेळ्याला हजेरी लावण्यासाठी रवाना झाले. त्यांच्या या दौऱ्याला धार्मिक तसेच राजकीय महत्त्व असल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून, आगामी काळात या भेटींचा कोणता परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.