
नेमकं काय घडलं ?
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे.
वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्याशिवाय, विरोधकांनी काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा आरोप करत धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासाठी घेरले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिंचन गैरव्यवहारात माझ्यावर आरोप झाल्यावर व्यथित होऊन नैतिकेला धरून मी तत्काळ राजीनामा दिला होता, असे सांगत राजीनाम्याबाबतच्या निर्णयाचा चेंडू धनंजय मुंडेच्या कोर्टात ढकलला. आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारताच त्यांनी केलेल्या कृतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वडिलांच्या निधनानंतर सांत्वनपर भेटीसाठी चंद्रकांत पाटील आज पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलणे टाळण्याचा प्रयत्न दादा यांनी केला. सध्या सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर चंद्रकांत दादांनी हात जोडून बोलणे टाळल्याचे पाहायला मिळाले.
स्वबळाची वक्तव्य टाळावीत : चंद्रकांत पाटील
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावलाय. महापालिका निवडणुकीत प्रत्येक ठिकाणचे चित्र आणि स्थिती वेगळी आहे. महापालिका निवडणुकांना अजून बराच अवधी असून याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. यानंतर प्रभाग रचना आणि अनेक कामे होतील. त्यामुळे या निवडणुकीबाबत युतीचा निर्णय होताना तो राज्य पातळीवर किंवा शहर पातळीवर घेतला जाऊ शकतो. प्रत्येक शहरात प्रत्येक पक्षाची ताकद किती यावर हे निर्णय होत असतात. अनेक ठिकाणी यापूर्वीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढल्या गेल्या आहेत. त्यामुळे महायुतीतील कोणत्याच बड्या नेत्यांनी स्वबळाबाबत वक्तव्य करू नये, अशा मताचा मी आहे. पण वक्तव्य करणारे नेते एवढे मोठे आहेत की, त्यांना मी काय सल्ला देऊ, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.