
पक्षाला लागलेल्या गळतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया…
शिवसेना ठाकरे गटातून गेल्या काही दिवसात अनेक नेते, पदाधिकारी बाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावर बोलताना “मी आता धक्का पुरुष झालो आहे”, असं म्हटलं.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देखील उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी कुर्ला, कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. विभागक्रमांक 6 च्या विभाग प्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी भेटायला आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जातं. मात्र आता मला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता मी धक्का पुरुष झालो आहे. असे कोण किती धक्के देतंय ते बघूया. यांना काय द्यायचा तो एकदाच धक्का देऊ.
सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे. लढाई एकट्याची नाही, ही लढाई आपली आहे. सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा. जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत. डोळे उघडून सर्वांनी हा सिनेमा बघा, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
संघटनात्मक बांधणी करण्याचे आता दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मग सर्वांनी दिलेली कामे शाखेनुसार करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केलं.