
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
मुंबई येथे आदिवासी विकास विभागाच्या बैठकीत महाराष्ट्रातील कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “नाग्या महादू कातकरी योजना” लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मा.ना.अशोक उईके (आदिवासी विकास मंत्री), विद्यमान आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, आदिवासी विभागाचे आयुक्त, अप्पर आयुक्त, सचिव, तसेच जव्हार व डहाणू प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. शुर झलकरी आदिम कातकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश धर्माजी सवरा, सचिव शांताराम ठेमका, कोषाध्यक्ष डॉ. रमेश भोये,पालघर जिल्हा सचिव शिवराम मुकणे,सिताराम सवरा, डहाणू तालुका अध्यक्ष गणेश गावित, सचिव दिलीप पवार, डहाणू उपाध्यक्ष विलास भोये,डहाणू उपाध्यक्ष सुरेश भोये,पालघर तालुका अध्यक्ष सुनील पवार, सचिव किरण पवार, सह.अनेक कार्यकर्तेही सहभागी झाले होते.या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील आदिम जमातींसाठी निधी वितरित केला जाणार असून, मागणीप्रमाणे अर्थसंकल्पीय तरतूद केली जाणार आहे. यासाठी पालघर जिल्ह्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, त्वरित अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. योजनेद्वारे कातकरी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार, पुनर्वसन, आर्थिक मदत आणि जीवनमान उन्नतीसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील.
राज्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर लवकरच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे.