
अजितदादा-शिंदे बरेच लांब; ‘मविआ’ महायुतीच्या आसपासपाही नाही…
पाच जागांसाठी जाहीर झालेली विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे. पाच जागांसाठी आलेल्या सहा अर्जांपैकी पाच अर्ज वैध ठरले होते. या पाच जणांनी आज (20 मार्च) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत अर्ज कायम ठेवले.
त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
राज्याला मिळाले नवीन 5 आमदार :
निवडणूक प्रक्रिया संपताच राज्याला नवीन 5 आमदार मिळाले आहेत. भाजपचे दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, राष्ट्रवादीचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी अशी या नव्या आमदारांची नावे आहेत.
भाजपचे संख्याबळ कमालीचे वाढले :
या घोषणेनंतर विधानसभेपाठोपाठ परिषदेतही भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. परिषदेत भाजपचे 22, राष्ट्रवादीचे 8 आणि शिवसेनेचे 7 असे महायुतीचे तब्बल 37 आमदारांचे संख्याबळ होणार आहे. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे 7, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3 आमदार राहणार आहेत.
21 जागा अद्यापही रिक्त :
काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 पैकी 6 सदस्यांची नियुक्ती झाली आहे. तर अद्याप 6 जागा रिक्त आहेत. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्धांच्या निवडणुका रखडल्याने आहेत. त्यामुळे 22 पैकी निवृत्त झालेल्या तब्बल 15 सदस्यांच्या जागेवरही निवडणूक झालेली नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 6 आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या 15 अशा 21 जागा आज घडीला रिक्त आहेत.
पुढील वर्षी रिक्त होणार आणखी 14 जागा :
याशिवाय छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील आमदार अंबादास दानवे यांची मुदत येत्या 29 ऑगस्ट रोजी संपत आहे. तर विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या 9 आमदारांची, शिक्षक मतदारसंघातील 2 आणि पदवीधर मतदारसंघातील 3 अशा 14 जणांच्या आमदारकीची मुदत पुढील वर्षाअखेरीपर्यंत संपत आहे.