
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी-सुधीर घाटाळ
गंजाड दसरा पाडा ते सोमनाथ सोमणपाडा मार्गाच्या पुलावरील सिमेंट रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून, त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांचे मोठे हाल होत आहेत. अपघाताचा धोका लक्षात घेता ग्रामस्थांनी तात्पुरता उपाय म्हणून खड्ड्यांमध्ये झाडाच्या फांद्या आणि दगड ठेवले आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी या पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हा रस्ता आमच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांपासून ते रोजंदारी करणाऱ्या मजुरांपर्यंत, सगळ्यांनाच हा रस्ता वापरावा लागतो. या रस्त्यावरील पुलाच्या दूरावस्थेची जर लवकरच दुरुस्ती झाली नाही, तर मोठी दुर्घटना घडू शकते.
– प्रवीण वरठा, स्थानिक ग्रामस्थ
या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावरून आम्ही बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करू आणि ग्रामपंचायत म्हणून या प्रकरणाकडे लक्ष देऊ व
ग्रामस्थांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू.
– कौशल कामडी, प्रभारी सरपंच – गंजाड ग्रामपंचायत
या रस्ता व ब्रीजवरील खड्ड्यांमुळे आमच्या गावातील नागरिकांना दळणवळणासाठी मोठा त्रास होत आहे. सदर ब्रीज, रस्ता व पंचक्रोशीतील अनेक नादुरुस्त रस्ते आणि पूल याकडे शासनाने पाहणी करून तातडीने दखल घ्यावी. अन्यथा संबंधित यंत्रणेवर आम्ही तीव्र मोर्चा काढू.
– अभिजित देशक, माजी पंचायत समिती सदस्य