
कार्यकारिणीची बैठकीत नेत्यांना सूचना…
दिल्ली : अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहे. अजित पवारांनी महायुतीत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. यानंतर शरद पवारांची साथ आणखी काही नेत्यांनी नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली.
याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे आता पक्षविस्तारासाठी शरद पवारांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दिल्लीत गुरुवारी (27 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणीची बैठकी पार पडला. या बैठकीत पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने लढण्याचा संदेश दिला.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दिल्लीत पहिल्यांदाच बैठक घेण्यात आली. या बैठकीला पक्षप्रमुख शरद पवार, कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, पी. सी. चाको, महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार आणि सर्व प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत सामाजिक व राजकीय विषयावर तसेच देशाच्या विद्यमान आर्थिक स्थितीबाबत पक्षाची भूमिका मांडणारे ठराव संमत करण्यात आले.
बैठकीमध्ये संघटनेवर बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात जिल्हाध्यक्ष 40 ते 50 वर्षे वयोगटातील नेमावे अशी सूचना केली. तर राजेश टोपे यांनी ओबीसी समुदायाचे मन जिंकण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी सूचना केली. याशिवाय बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी आजी-माजी आमदार, खासदारांना जबाबदारी सोपवावी अशा मागण्याही कार्यकारिणीच्या बैठकीत पुढे आल्या.
कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या राजकारणात भाजपाच्या विरोधातील राजकीय अवकाश मोठा आहे, त्यात आपल्या पक्षाला मोठी संधी आहे. त्यामुळे विजय पराजयाचा विचार न करता कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीवर कायम राहावे असे आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. याचवेळी त्यांनी संसदेत बोलण्याची संधी कमी होत असल्याची खंत व्यक्त करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. दरम्यान, समारोपप्रसंगी शरद पवार यांनी संघटना वाढीसाठी महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांमध्ये फिरण्यासाठी प्रमुख नेत्यांची टीम तयार करण्याची सूचना केली.