
आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता असतो. त्या मुद्यावर एकदा सहानुभूती मिळाली अन् निवडणुका जिंकल्या की तो मुद्दा बाजूला पडतो, असा गंभीर आरोप आनंद दिघे यांचे पुतणे व ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी केला
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटावर गंभीर आरोपही केले.
काय म्हणाले केदार दिघे?
ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाचा बुधवारी मेळावा झाला. या मेळाव्यात केदार दिघे बोलत होते. त्यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, शिंदेंकडे एवढी ताकद आहे, अनुभव आहे, संपत्ती आहे तर ठाणेकरांचे प्रश्न का सुटले नाहीत? केवळ निवडणुका आल्या की आनंद दिघे साहेबांची आठवण येते. आनंद दिघे साहेबांच्या नावाचे राजकारण फक्त सहानुभुती मिळविण्यासाठी शिंदे गट करतोय, असा आरोप दिघे यांनी केला.
प्रवेशद्वार कुठे गेले ?
यावेळी केदार दिघे यांनी आनंद दिघे साहेबांच्या नावाने प्रस्तावित असणाऱ्या प्रवेशद्वाराच्या प्रश्नालाही हात घातला. ते म्हणाले, मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर आनंद दिघे साहेबांच्या नावाने प्रवेशद्वार करण्यात येणार होते. हे प्रवेशद्वार आता कुठे गायब झाले? आनंद दिघे साहेबांच्या नावाने करण्यात येणाऱ्या स्मारकाचाही शिंदे यांना विसर पडलाय. जे ठेकेदार काळ्या यादीत आहेत, त्यांना कामे दिली जात आहेत, असा आरोपही केदार दिघे यांनी केला.
केवळ दबावातून फोडाफोडी
आपल्या भाषणात केदार दिघे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, विरोधकांनी कितीही फोडाफोडी केली तरी मुळचा शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी राहणार आहे. जे गेले त्यांच्यावर काही ना काही कारणातून दबाव टाकण्यात आला. दबावापोटीच लोक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असा थेट आरोप केदार दिघे यांनी केला.