
शशी थरूर यांचं सडेतोड उत्तर; ‘त्या’ चर्चांना पूर्णविराम…
पाकिस्तानचा दहशतवादी पोसणारा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारतातील सर्वपक्षीय खासदार व माजी सनदी अधिकाऱ्यांची सात शिष्टमंडळं जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवण्यात आली आहेत.
ही शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांत जाऊन भारताची बाजू मांडत आहेत, दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती व गरज पटवून देत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर पाठवण्यात आलं आहे.
भारताची शिष्टमंडळं आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या कुरापती जाहीर करत आहेत. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर आघाडीवर आहेत. या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी निवड झाल्यापासूनच थरूर देशभर चर्चेत आहेत. शशी थरूर यांची या शिष्टमंडळाबरोबर परदेशात जाण्यासाठी काँग्रेसने नव्हे तर केंद्र सरकारने निवड केली होती. त्याचबरोबर अलीकडच्या काळात थरूर व काँग्रेसमध्ये तणाव असल्याची चर्चा रंगत होती. त्यावरून थरूर यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही मोदी सरकारसाठी काम करत आहात का? यावर थरूर म्हणाले, “मी सरकारसाठी काम करत नाही, मी विरोधी पक्षातला नेता आहे. मी इथे माझ्या देशाची बाजू मांडायला आलो आहे.
“मी सरकारसाठी काम करत नाही”
शशी थरूर म्हणाले, “मी सरकारसाठी काम करत नाही. तुम्हा सर्वांना कल्पना आहे की मी विरोधी पक्षात आहे. परंतु, अलीकडेच मी देशातील लोकप्रिय वृत्तपत्र दी इंडियन एक्सप्रेसमध्ये माझे विचार मांडले होते. त्या लेखाद्वारे मी माझे विचार ठामपणे मांडले होते. मी लिहिलं होतं की यावेळी पाकिस्तानला केवळ जशास तसं प्रत्युत्तर देऊन चालणार नाही, उलट एक पाऊल पुढं जावं लागेल. भारतीय लष्कराने नेमकं तेच केलं हे पाहून मला खूप समाधान झालं आहे. भारताने यावेळी ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, तिथे स्ट्राइक केला तो त्यांच्यासाठी स्पष्ट संदेश आहे की आम्ही त्यांच्या कुरापती सहन करणार नाही. दहशतवाद आम्हाला झुकवू शकणार नाहीत”.
अलीकडच्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस केंद्र सरकारविरोधात विविध मुद्द्यांवर आक्रमक झालेली असताना थरूर यांनी मात्र मवाळ भूमिका घेतली होती. त्यामुळे थरूर आणि काँग्रेसचं काही मुद्द्यांवर एकमत नसल्याची चर्चा होती. त्यातच केंद्र सरकारच्या इच्छेनुसार थरूर भारतीय शिष्टमंडळाबरोबर परदेशात गेले आहेत. त्यामुळे थरूर यांना त्यांच्या उद्देशांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, “मी सरकारसाठी काम करत नाही, मी विरोधी पक्षात आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
थरूर यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
शशी थरूर यांनी न्यूयॉर्कमधील भारताच्या वाणिज्य दूतावासात अमेरिकेतील थिंक टँक व प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. थरूर म्हणाले, पाकिस्तान भारताची जमीन बळकावण्यासाठी सातत्याने भारतीय हद्दीत दहशतवादी हल्ले घडवून आणत आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचं प्रमुख उद्दीष्ट देखील त्याचाच एक भाग होतं. जम्मू-काश्मीरची शांतता भंग करणे, तिथे तणाव निर्माण करणे आणि भारतात हिंसाचार करणे हे त्या हल्ल्याचं उद्दीष्ट होतं. त्या दहशतवाद्यांनी हिंदू नागरिकांना गोळ्या घातल्या.