
महायुती सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून लाडकी बहीण योजनेकडे पाहिले जाते. पण ही योजना सातत्यानं चर्चेत असते. याचदरम्यान या योजनेतून 50 लाख महिलांना अपात्र करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अशातच आता या योजनेवरुन माजी मंत्री थेट कोर्टाची पायरी चढून महायुती सरकारविरोधात दंड थोपटणार असल्याची चर्चा आहे.
माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांनी या योजनेतून अपात्र करण्यात येत असलेल्या महिलांसाठी मोठा लढा उभारण्याचा इशाराही सरकारला दिला आहे.
माजी आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी (ता.4जून ) अमरावतीत लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojana) भूमिका मांडली. राज्यातील महायुती सरकारची लाडक्या बहिणींची पात्र-अपात्रतेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आम्ही या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत. या योजनेतील महिलांना अपात्र ठरवण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचंही ठणकावलं.
बच्चू कडू म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पात्र-अपात्र न पाहता मतं घेण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. एकदा पात्र-अपात्रतेची सर्व कारवाई पूर्ण झाल्यानंतर आम्ही अपात्र महिलांना सोबत घेऊन न्यायालयात जाणार आहोत, असा थेट इशारा कडू यांनी दिला.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही फसवणूक असून याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणुकीत पात्र अपात्र न पाहता मतं घेण्यासाठी केलेला हा प्रकार आहे. एकदा पात्र-अपात्रची सर्व कारवाई झाली की त्यानंतर आम्ही अपात्र महिलांना सोबत घेऊन न्यायालयात जाणार आहोत, असेही कडू यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) एकीकडे मे चा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे चिंतातूर झालेल्या महिलांचे या हफ्त्याकडे लक्ष लागलेले असतानाच एक मोठी माहिती समोर आली असून आता 50 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आली आहे.यात 50 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली आहे. तसेच सरकार इन्कम टॅक्स विभागाच्या माहितीच्या आधारे महिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी करणार आहे.
महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. मात्र,मे महिन्याच्या अखेर येत असतानाही अजूनही या योजनेतील बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी 1500 रुपयांच्या हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत. कदाचित मे-जूनचे पैसे वटपौणिमेच्या दिवशी देण्याचे नियोजन सरकारचे सुरु असल्याचे बोलले जात आहे. पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.
- महायुती सरकार कदाचित मे-जूनचे पैसे वटपौणिमेच्या दिवशी दिवशी पात्र महिलांच्या खात्यात जमा करु शकते. पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण चिंतातूर महिलांचे या हफ्त्याकडे लक्ष लागलेले आहेत.