
सावळ्या विठुरायाची रोज नित्य पूजा केली जात असते. या पूजेतील असलेल्या तुळशी पूजेमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सामान्य भाविकांना रांगेत ताटकळत तासनतास उभे राहावे लागत आहे.
यामुळे भाविकांच्या सोयीसाठी आषाढी यात्रेपर्यंत विठ्ठलाच्या संपूर्ण तुळशी पूजा विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तात्काळ बंद कराव्यात; अशी मागणी पुढे आली आहे.
पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाची नित्य पूजा, तुळशी पूजा, पाद्य पूजा, चंदन उटी आदी प्रकारच्या पूजा भाविकांच्या हस्ते केल्या जातात. या पूजेमध्ये बराच वेळ जात असतो. तर पूजा सुरु असताना भाविकांना दर्शनासाठी सोडले जात नाही. दरम्यान या पूजांमुळे दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. तर दोन दिवसांपूर्वी अधिक वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागल्याने संतप्त झालेल्या भाविकांनी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली होती…
भाविकांच्या सुविधेसाठी मागणी
सध्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. अशातच सकाळी व संध्याकाळी मंदिर समितीकडून तुळशी पूजा केली जाते. या पूजेसाठी बराच वेळ जातो. यामुळे दर्शन रांग रखडली जाते. त्यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांना विठ्ठल दर्शनासाठी दर्शन रांगेत आठ ते दहा तास थांबावे लागते. वेळेत दर्शन व्हावे यासाठी तुळशी पूजा बंद कराव्यात अशी मागणी वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण वीर महाराज यांनी केली आहे.
भाविकांच्या गर्दीत होणार वाढ
दरम्यान पुढील महिन्यात आषाढी यात्रा आहे. या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. शिवाय पायी दिंड्या देखील पंढरपूरमध्ये येत असतात. यामुळे भाविकांच्या आता किमान पुढील दोन महिने भाविकांची गर्दी अधिक राहणार आहे. या अनुषंगाने आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे; यासाठी नित्य तुळशी पूजा बंद करण्याची मागणी होत आहे. यावर आता मंदिर समिती काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.