खुद्द अजित पवारांनीच…
सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरु आहे. कारण काही या निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातल्या 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदानाची तारीखदेखील जाहीर झाली आहे.
त्याच अनुषंगाने आता स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. राज्यातले मोठे नेतेही स्थानिक राजकारणात लक्ष घालून आहेत आणि विविध आघाड्या व युत्या करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.
राज्यामध्ये विचारांना बाजूला ठेवून अनेक ठिकाणी अभद्र आघाड्या पाहायला मिळत आहेत. त्याचवेळी अशा आघाड्यांमध्ये आता आणखीन वाढ होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता शरद पवार व अजित पवार हे काका पुतणे एकत्र येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षानेच याबद्दलची माहिती बोलून दाखवली आहे.
अजित पवार व सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणीचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला आहे. अजितदादा शरद पवारांशी चर्चा करतील, मग अंतिम निर्णय होईल, असा दावा पिंपरी चिंचवडमधले अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. ही माहिती खुद्द अजित पवारांनीच दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याचे पाहायला मिळते आहे.
दरम्यान, यापूर्वीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बीड, चंदगड. बार्शीसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. त्यानंतर आता घडलेल्या या नव्या घडामोडीत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीतनंतर महाराष्ट्रात मोठं सत्ता नाट्य पाहायला मिळालं होतं. अजित पवारांनी पक्षप्रमुख शरद पवारांपासून विभक्त होत त्यांच्या गट निर्माण केला आणि महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवारांनी नवा पक्ष स्थापन केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले. एकाचं नेतृत्व अजित पवार करतात तर दुसऱ्यांचं शरद पवार. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगत असतात.


