
रेल्वेमंत्र्यांचा मोठा निर्णय !
रेल्वे वाहतूक हा देशातील दळणवळणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक दशकांपासून रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जोडण्याचे काम केले आहे. भारतीय रेल्वेमधून असंख्य लोकं प्रवास करतात.
अशा सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने आता तत्काळ तिकीटांच्या बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने आता तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. लवकरच तात्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जाणार आहे. खासकरून तिकीट दलाल आणि बेकायदेशीर बुकिंग थांबवण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात येत आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू प्रवाशांना वेळेत तिकीट उपलब्ध होण्यास मदत होईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, लवकरच तात्काळ तिकिटे बुक करताना ई-आधार प्रमाणीकरण आवश्यक असणार आहे. यामुळे प्रत्येक प्रवाशाला त्यांची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळावी लागेल, ज्यामुळे बनावट बुकिंग आणि बॉट्सद्वारे तिकिटे खरेदी करण्याच्या घटनांना आळा बसेल. समोर आलेल्या माहितनुसार, पहिल्या 10 मिनिटांसाठी ज्या प्रवाशांचे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक असेल त्याच प्रवाशांना तात्काळ तिकीट बुक करता येणार आहे. IRCTCच्या दलालांना या 10 मिनिटांत बुकिंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ई-आधार पडताळणीच्या या नवीन उपक्रमामुळे बनावट तसेच लिपी-आधारित बुकिंग थांबेल. तर त्याच वेळी प्रवासाचा अनुभव अधिक सुरक्षित आणि चांगला होईल.
दरदिवशी अंदाजे 2,25,000 प्रवासी भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे तात्काळ तिकिटे बुक करतात. 24 मे ते 2 जून या कालावधीतील ऑनलाइन तात्काळ तिकिट बुकिंग पॅटर्नवरून असे दिसून आले की, तात्काळ खिडकी उघडल्यानंतर पहिल्या मिनिटांतच सरासरी 1,08,000 एसी क्लास तिकिटांपैकी फक्त 5,615 तिकिटे बुक झाली. तर, दुसऱ्या मिनिटात 22,827 तिकिटे बुक झाली. एसी क्लासमध्ये खिडकी उघडल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांत सरासरी 67,159 तिकिटे ऑनलाइन बुक झाली, जी ऑनलाइन बुक केलेल्या सर्व तिकिटांपैकी 62.5 टक्के आहे. याशिवाय, उर्वरित 37.5 टक्के तिकिटे चार्ट तयार होण्याच्या 10 मिनिटे आधी बुक झाली होती, त्यापैकी 3.01 टक्के तिकिटे तात्काळ खिडकी उघडल्यानंतर 10 तासांनी बुक झाली होती.
नॉन-एसी श्रेणीमध्ये 24 मे ते 2 जून या कालावधीत दररोज सरासरी 1,18,567 तिकिटे ऑनलाइन बुक करण्यात आली. त्यापैकी 4,724 तिकिटे सुमारे 4 टक्के पहिल्या मिनिटात बुक करण्यात आली, तर 20,786 तिकिटे सुमारे 17.5 टक्के दुसऱ्या मिनिटात बुक करण्यात आली. खिडकी उघडल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांत सुमारे 66.4 टक्के तिकिटे विकली गेली. त्याशिवाय खिडकी उघडल्यानंतर पहिल्या तासात सुमारे 84.02 टक्के तिकिटे विकली गेली. तर उर्वरित तिकिटे पुढील 10 तासांमध्ये विकली गेली. यावरून स्पष्ट होते की तत्काळ तिकिटे प्रवाशांना ऑनलाइन प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली जातात आणि खिडकी उघडल्यानंतर 8 ते 10 तासांनंतरही सुमारे 12 टक्के तात्काळ तिकिटे बुक केली जातात.