
नुसतं नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या चारही महापालिका ताब्यात घेण्याचा निर्धार !
लोकसभा निवडणुकीत फटका बसला तरीही विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला चांगलं यश आलं. सर्वांधिक आमदार महायुतीचे निवडून आले. आता हेच यश कायम ठेवत उत्तर महाराष्ट्रातील चारही महापालिका भाजपच्या ताब्यात घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
विशेषत: नाशिक महापालिकेत शंभर हुन अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना मैदानात उतरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिकच्या खुटवड नगर येथे सिद्धी बॅन्क्वेट हॉलमध्ये गुरुवारी (ता. ५) भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यशाळा पार पडली. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ ऑगस्टच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता असून, त्यासाठी तयारीला लागा अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी, व्यासपीठावर भाजप केंद्रीय राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, विपणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे, भारती नाईक आदी उपस्थित होते.
लवकरच निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठी प्रत्येक मंत्र्याने राज्यभर दौरे करण्याची गरज आहे. त्यामुळे पुढची दोन महिने मंत्रालय बंद करा, मंत्र्यांना लोकांमध्ये जाऊद्या. पुढच्या पंधरा दिवसांत संघटन मजबूत करण्याचे ध्येय ठेवून जास्तीत जास्त पक्षप्रवेश करुन घ्या असे बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले, महायुतीचा निर्णय वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र स्वबळावर लढण्याची देखील तयारी ठेवा. यंदा उत्तर महाराष्ट्रातल्या चारही महापालिका भाजपच्या ताब्यात यायला हव्यात. नाशिकमध्ये शंभर हुन अधिक जागा जिंकण्यासाठी तयारीला लागा. सरकारच्या योजनांचा प्रचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची गरज असून, त्यासाठी अंतर्गत गटबाजी थांबवून सर्वांनी एकत्रितपणे कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.