
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या क्रू मेंबर्सच्या जीवनकथा काळजाला चटका लावतील !
अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश सुन्न झाला. लंडनकडे जाणाऱ्या ड्रीमलाइनर विमानात 242 प्रवासी होते. त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला.
यात 12 केबिन क्रू सदस्यही होते. या सगळ्यांच्या जीवनकथा ऐकल्या की फक्त दु:खच नव्हे, तर अभिमानही वाटतो.
कॅप्टन सुमीत सभरवाल: शेवटच्या उड्डाणात हरवलेलं स्वप्न
60 वर्षांचे कॅप्टन सुमीत सभरवाल काही महिन्यांत निवृत्त होणार होते. त्या नंतर वडिलांबरोबर अधिक वेळ घालवण्याचा त्यांचा विचार होता. त्यांचा शिस्तबद्धपणा आणि शांत स्वभाव सर्वांनाच प्रेरणादायी वाटायचा. “ते फारसे बोलायचे नाहीत, पण त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी होतं,” असं एका शेजाऱ्याने बोलत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पवईत त्यांचा परिवार, आणि दिल्लीत राहणारी बहीण असे सगळेच या घटनेमुळे दुःखात आहेत.
दीपक पाठक: जबाबदारी जपणारा मुलगा
बदलापूरच्या दीपक पाठक 11 वर्षांपासून एअर इंडियात सेवा करत होते. प्रत्येक फ्लाइटपूर्वी आईला फोन करणं हे त्यांचं नित्याचं होतं. अपघाताच्या दिवशीही त्यांनी आईशी बोलून ‘सगळं ठीक आहे’ असं सांगितलं. “त्याचा फोन आला, म्हणून आम्हाला वाटलं काही घडलं नसेल,” असं कुटुंबियांनी सांगितलं. पण जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा संपूर्ण बदलापूरमध्ये दुःखाचा मळवट पसरला. दीपकचा हसरा चेहरा आणि कर्तव्यनिष्ठा आता केवळ आठवणीत उरली आहे.
सॅनिता चक्रवर्ती: ‘पिंकी’ची अपूर्ण कहाणी
जुहू कोळीवाड्यातली 35 वर्षीय सॅनिता चक्रवर्तीला सगळेच ‘पिंकी’ म्हणून ओळखायचे. मेहनती आणि कष्टातून उभं राहिलेलं तिचं आयुष्य नुकतंच एअर इंडियाशी जोडलेलं होतं. गो एअर सोडल्यानंतर ही तिची नवी सुरुवात होती. तिची बालमैत्रीण निकी डीसूझा म्हणाली, ती खूप मेहनती होती. तिच्या इयर होस्टेसच्या ड्रेसचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटायचा.आज ती हसणारी पिंकी फक्त आठवणींमध्ये राहिली आहे.
मैथिली मोरेश्वर पाटील: एका गावाची शान
पनवेलजवळच्या न्हावा गावातली 24 वर्षांची मैथिली पाटील ही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेली मुलगी होती. पण तिचं स्वप्न मात्र आभाळाएवढं मोठं. एविएशन कोर्स पूर्ण करून एअर इंडियात दाखल झालेल्या मैथिलीने अनेक मुलींना प्रोत्साहित केलं होतं. “ती आमची अभिमान होती. तिच्या यशामुळे गावाचं नाव उजळलं होतं.” असं तिच्या एका शेजाऱ्याने सांगितलं. तिचे अपूर्ण स्वप्न आता गावातल्या इतर मुलींना प्रेरणा देत राहील.
रोशनी राजेंद्र सोंगारे: स्वप्नांना पंख देणारी मुलगी
डोंबिवलीच्या 27 वर्षांच्या रोशनीचं बालपणापासूनचं स्वप्न होतं एअर होस्टेस बनण्याचं. अखेरीस ते स्वप्न पूर्ण झालं होतं. एअर इंडियात नुकतीच रुजू झालेली रोशनी तिच्या एनर्जी आणि हसऱ्या स्वभावासाठी ओळखली जायची. तिच्या इंस्टाग्रामवर 54,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. अपघाताची बातमी मिळताच तिचं कुटुंब मुंबई विमानतळावर धावत आलं. “ती आमचा अभिमान होती” असं आईवडिलांनी भरल्या डोळ्यांनी सांगितलं.
हा अपघात केवळ एका विमानाचा नव्हता तो अशा अनेक आयुष्यांचा शेवट होता. या घटनेबद्दल DGCA कडून चौकशी सुरू आहे, पण या कुटुंबांचं दु:ख कधीही संपणार नाही.