
डोळ्यादेखत 241 जणांचा मृत्यू पाहिला; विमान अपघातातून एकटा वाचला विश्वास!
ज्याला देव तारी, त्याला कोण मारी’, ही म्हण एअर इंडियाच्या विमानात प्रवास करणाऱ्या 40 वर्षीय प्रवासी विश्वास कुमार रमेश यांना अगदी बरोबर लागू होते.
होय, कारण, डोळ्यादेखत विमानात बसलेल्या 200 हून अधिक लोकांचा मृत्यू पाहिला, पण त्या अपघातातून विश्वास यांचा जीव वाचला. त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी हे अगदी सत्य आहे.
अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी माहिती दिली आहे की, विश्वास कुमार रमेश 11 A क्रमांकाच्या सीटवर प्रवास करत होते, जे जिवंत आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छाती, डोळे आणि पायांवर अनेक जखमा झालेल्या असल्या तरी देखील विश्वास आता स्थिर आहे. दरम्यान, विश्वास याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मृत्यू माझ्या डोक्यावरून गेला, मी वाचलो. तर अपघात कसा घडला, याचा थरार देखील सांगितला.
भारतीय वंशाचा ब्रिटीश नागरिक आहे विश्वास!
विश्वास हा ब्रिटिश नागरिक आहे आणि काही दिवसांसाठी त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आला होता आणि त्याचा भाऊ अजय कुमार रमेश (45) सोबत परत युकेला जात होता. विश्वास आणि त्याचा बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या विश्वासने काही सेकंदात जीवन आणि मृत्यूमधील अंतर कसे जाणवले ते सांगितले. तो म्हणतो की तो अजूनही जिवंत आहे हा एक चमत्कार आहे.
अपघात कसा झाला?
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना विश्वास म्हणाला, विमानाने उड्डाण करताच, 30 सेकंदात मोठा आवाज झाला आणि नंतर विमान कोसळले. हे सर्व खूप लवकर घडले.
विश्वास म्हणाला, जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझ्याभोवती मृतदेह पडलेले होते. मी घाबरलो. मी उभा राहून पळत सुटलो. माझ्याभोवती विमानाचे तुकडे पडले होते. कोणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.
विश्वास म्हणाला की तो 20 वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे. त्याने सांगितले की त्याची पत्नी आणि मूल देखील लंडनमध्ये राहतात.
त्याने सांगितले की त्याचा भाऊ अजय विमानात वेगळ्या सीटवर बसला होता. तो म्हणाला, आम्ही दीवला गेलो होतो. तो माझ्यासोबत प्रवास करत होता आणि आता मला तो सापडत नाहीये. कृपया मला त्याला शोधण्यात मदत करा.