
खामगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी आपण एकटेच नव्हे तर तब्बल 25 हजार कार्यकर्तेसोबत आणल्याचा दावा केला आणि विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच प्रेम करावे आणि डोक्यावर आशीर्वाद ठेवावा, अशी विनंती केली.
यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) सुद्धा लगेच त्यांचाही पेक्षा जास्त प्रेम करून आणि सन्मान देण्याचा वादा याप्रसंगी केला.
सुमारे महिनाभरापासून सानंदा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा बुलढाणा जिल्ह्यात होती. त्यांचे काही समर्थक आधीच राष्ट्रवादीत दाखल झाले होते. मात्र सानंदा यांचे तळ्यात मळ्यात सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही त्यांनी या दरम्यान भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे सानंदा नेमके कुठल्या पक्षात जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी ‘मै काँग्रेस का परिंदा हूँ’ असे सांगून पक्ष सोडणार नाही, असा दावा केला होता. राष्ट्रवादीचे निश्चित झाल्यानंतरही त्यांनी मी काँग्रेस सोडली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले होते. दोन्ही पक्षांची विचारधारा एकच आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली होता.
खामगाव विधानसभा मतदारसंघात आकाश फुंडकर आमदार आहेत. ते कामगार मंत्री आहेत. हे बघता भाजपमध्ये नाराजी निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. सानंदा यांनी आपण स्वतःच महायुतीच्या सर्व नेत्यांच्या घरी जाऊन त्यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी (NCP) वगळता भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते फिरकले नाही.
दिलीपकुमार सानंदा यांच्यासारखा अनुभवी, प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेला नेता पक्षात आल्यामुळे जिल्ह्यासह विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच फायदा होणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. विलासराव देशमुख यांनी त्यांच्यावर जेवढे प्रेम केले तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिक प्रेम व सन्मान त्यांना पक्षात दिल्या जाईल.
येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या लढताना महायुतीमध्ये काही निर्णय स्थानिक स्तरावर होतील. त्यावेळी आपल्या पक्षात आलेल्यांमध्ये नवा किंवा जुना असा वाद होऊ देणार नाही.
तसेच स्थानिक स्वराज्य सस्था, विधान परिषद निवडणुकीत सर्वांना भरभरून देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे. सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे व आपल्या विचारधारेचा सभापती, अध्यक्ष कसा बसेल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.