
तुम्ही मला निवडणुकीत पाडले; आता मी तुमच्या मागे लागणार…
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी सर्वजण (सर्व पक्षाचे नेते) एकत्र आले होते. विधानसभा निवडणुकीत तर माझा निसटत्या मतांनी पराभव झाला. मी पत्रकार म्हणून तब्बल २४ वर्षे काम केलेले आहे, त्यानंतर मी आमदार आणि खासदार झालो आहे.
मी आता माझ्या मूळ पदावर आलेलो आहे. तुम्ही मला निवडणुकीत पाडले, आता मी तुमच्या मागे लागलो आहे, असे सांगत सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांची आपण झोप उडविली आहे. त्यांनी केलेला गैरव्यवहार बाहेर काढला आहे, असा इशारा एमआयएमचे माजी खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी नई जिंदगी येथील सहारा मल्टिपर्पज हॉल येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जलील यांनी संजय शिरसाटांच्या गैरव्यवहाराबाबत भाष्य केले. या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष तथा शहराध्यक्ष फारुक शाब्दी, अन्वर सादात, शौकत पठाण आदी उपस्थित होते.
संजय शिरसाट यांच्या मुलाने संभाजीनगर येथील ११० कोटी रुपयाचे व्हिट्स हॉटेल ६८ कोटी रुपयांना खरेदी करत असल्याचा आरोप झाला होता. त्यासाठी शिरसाटांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर केल्याचे सांगितले जात होते. मात्र, संजय शिरसाटाच्या मुलाने व्हीट्स हॉटेल खरेदीतून माघार घेतली आहे. शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड, तसेच सरकारी जमिनी, बेकायदा प्लॅट खरेदीबाबत जलील हे शिरसाटांच्या मागे हात धुवून लागले आहेत.
इम्तियाज जलील म्हणाले, महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाचा पराभव झाला; पण पक्ष संपला नाही. एमआयएमबद्दल जनतेच्या मनात आजही प्रेम आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत अच्छे दिन येणार असे आश्वासन दिले होते. त्यांना अच्छे दिन आले की नाही, माहिती नाही. पण, एमआयएम पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अच्छे दिन नक्कीच येतील, असा विश्वासही इम्तियाज जलिल यांनी व्यक्त केला.
‘एमआयएम पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार आहे. आपल्याला पराभूत करण्यासाठी काहीही केले जाईल. कोणीही कोणासोबत युती, आघाडी करेल. पैशांचा प्रचंड वापर होईल. पण, एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी सजग राहावे, असे आवाहन माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले.
सोलापूरची जनता ओवेसींवर प्रेम करणारी : शाब्दी
विधानसभा निवडणुकीची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत नव्हतो, पण, महापालिका निवडणुकीची मी आतुरतेने वाट पाहत आहे. सोलापुरात एमआयएम आणि खासदार असदोद्दिन ओवेसी यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येने आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएम सोलापुरात दमदार कामगिरी करेल, असा दावा प्रदेश कार्याध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केला आहे.