
संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका !
मुंबई : लोकशाहीवादी भारताच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मोदी यांना पंतप्रधानपदी येऊन 11 वर्षे झाली. 11 वर्षांत ते एकदाही पत्रकार परिषदेला सामोरे गेले नाहीत.
हा एक विश्वविक्रम असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दबाव टाकून पाकिस्तानविरुद्धची लढाई भारताला थांबवायला सांगितली. ही लढाई जमिनीसाठी नव्हती, तर भारतीय हद्दीत पाकिस्तानने केलेल्या दहशतवादाविरुद्ध होती, यावरूनही राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत ऑपरेश सिंदूर राबवले. यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र, भारत – पाकिस्तानमधील हा संघर्ष आपण थांबवल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यानंतर केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भारताने आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशात आपले सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ पाठवले. याबाबतच राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.
राऊत म्हणतात, विरोधी पक्षांनी यावर टोकदार प्रश्न विचारू नयेत म्हणून मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांना जगभ्रमणासाठी पाठवले आणि भारतात शांतता प्रस्थापित केली. परदेशातून आलेल्या सर्व खासदारांना मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत चहापानास बोलावले. तेथे नक्की काय चर्चा झाली ते बाहेर आले नाही, पण ‘पंतप्रधान मोदी यांनी सुप्रिया सुळेंकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची खास चौकशी केली’ एवढे वृत्त मात्र बाहेर आले. हे गमतीशीर आहे. मोदी हे पवारांना थेट फोन करून त्यांच्या प्रकृतीची सहज चौकशी करू शकतात, पण त्यांनी चौकशी सुप्रिया सुळेंकडे केली. विशेष म्हणजे, या खासदारांपैकी एकानेही “प्रे. ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणून पाकिस्तानबरोबरचे युद्ध का थांबवले? तुम्ही दबावाखाली का झुकलात?” असे सडेतोड प्रश्न विचारले नाहीत, असेही राऊत म्हणाले आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भारतातील हस्तक्षेपावर मोदी चूप आहेत. चीनने पाकिस्तानला मदत केली. त्यावरही ते बोलत नाहीत. इतके मौन तर मनमोहन सिंग यांनीही पाळले नव्हते, असे राऊत म्हणतात. भारतावर राज्य करण्याचे नैतिक बळ मोदी यांनी गमावले आहे. भारताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी अवहेलना कधीच झाली नव्हती, तेवढी मोदींच्या अमृतकाळात झाली. तरीही मोदी व त्यांचे भक्त खूश असतील तर देशाच्या अधःपतनाचे हे शेवटचे टोक आहे, असेही ते म्हणतात.