
जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती स्बवळावर लढणार की एकत्रितरित्या लढणार याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्याचवेळी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वीच्या काळात अनेक जण इकडे-तिकडे जाऊ शकतात. पण त्यामुळे कुणी विचलित होण्याची गरज नाही. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर फोकस करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत.
तीन-चार दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापनदिन सोहळा पडला. पण त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितरित्या निवडणुका लढतील अशी चर्चा रंगली असतानाच वातावरण चांगलेच तापले आहे.
यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ” येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवढणूकीची घोषणा झाल्यानंतर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील, पण त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर लक्ष द्या.यावेळी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊळ. सोशलमिडीयावर लक्ष द्या. तालुका, जिल्हा पातळीवर आपला सोशल मीडियावर कसा हवा, यावरही लक्ष ठेवा, आपण करत असलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.
जयंत पाटील यांनी मुंबई मनपाच्या ठेवींवरून सरकारवर निशाणा साधला. मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. पण आता या ठेवी रिकाम्या होऊ लागल्या आहेत. 2 लाख 36 कोटींच्या कामाच्या ऑर्डर दिल्या आहेत. पण आता त्यासाठी त्यांना द्यायला पैसाच शिल्लक राहिला नाही. पण आता यांच्याकडे त्यासाठी द्यायला पैसे राहिलेले नाहीत. असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले की, “मुंबई सहजासहजी आपल्याला मिळालेली नाही, ती मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र आज मुंबईतील अनेक महत्त्वाच्या संस्था, कार्यालये आणि योजना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत, ही गंभीर बाब आहे,” मुंबईत पूर्वी असलेले पेटंट कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरीत करण्यात आले असून, याचे मुख्यालय पाच दशकांनंतर मुंबईबाहेर गेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हेही सुरुवातीला मुंबईसाठी नियोजित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात या केंद्राची संकल्पना सादर करण्यात आली होती. अर्थविषयक सर्व प्रमुख संस्था या केंद्राअंतर्गत असणार होत्या, मात्र आता हे केंद्र गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईचा पारंपरिक हिरेबाजारही गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. “या साऱ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आता डोळसपणे विचार करायला हवा. मुंबईचे आर्थिक आणि संस्थात्मक महत्त्व कसे कमी केले जात आहे, याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.