
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा सत्ता मिळणार !
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख होती. मात्र, 2017 पासून भाजपने येथे आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड विशेष लक्ष देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकतेच शहराच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन गेले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आढाव बैठक घेत पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
पवारांनी आढावा घेताना माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यावर शहराची जबाबदारी टाकली आहे. पाटील यांना शहराची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्र्वादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे त्यांच्या समोर आव्हान असणार आहे.
हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. महायुतीच्या बाजुने निकाल लागल्यानंतर अनेकांना पक्षांतर करत भाजप किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, त्यांनी शरद पवारांना साथ देत ते पक्षात सक्रीय झाले.
आव्हानांचा डोंगर…
राष्ट्रवादी एकसंध असताना अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहराकडे विशेष लक्ष देत होते. त्यांच्या माध्यमातून या शहराचा मोठा विकास देखील झाला. मात्र, 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक जण भाजपमध्ये गेले. महापालिकेत भाजपची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते हे अजित पवारांच्यासोबत राहिले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भोसरी विधानसभा लढणारे अजित गव्हाणे हे निवडणुकीनंतर पुन्हा अजित पवारांच्यासोबत गेले. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांसमोर पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आव्हानांचा डोंगर असणार आहे.
राहुल कलाटे पक्षांतराच्या तयारीत?
विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, पिंपरी, चिंचवड अशा तीन विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लढल्या होत्या. त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही.चिंचवडची जागा राहुल कलाटे यांनी लढली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कलाटे हे देखील पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.