
जर तो पुन्हा दिसला…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 8 महिन्यंनी ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सर्वच लोकप्रतिनिधी संतापलेले पहायला मिळालं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेश म्हस्के, बाळ्या मामा म्हात्रे, किसन कथोरे, संजय केळकर यांसह विविध आमदार आणि अधिकारी उपस्थित होते. सर्वांनीच अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडीवरुन झापलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीच्या मुद्यावरुन डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याचं जागेवरच निलंबन केलं.
या बैठकीत 2025-26 साठी 1300 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला, जो 1500 कोटीपर्यंत वाढू शकतो. STEM (ठाणे पाणीपुरवठा संस्था) चे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या अनधिकृत नियुक्तीची चौकशीचे आदेश दिले गेले. बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून सुभाष उमराणीकर यांची नियुक्ती झाली. तसंच, वाहतूक कोंडीवर संतापातून डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याचे जागेवर निलंबन करण्यात आले.
…डोंगरेला निलंबित करा
काम होत असताना ते चांगल्या दर्जाचे होत आहे की नाही हे पाहणे तुमची जबाबदारी आहे. जर ते झाले नाही तर तुमच्यावर कारवाई होणार, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. तसंच कधीपर्यंत हा रस्ता होणार? असा प्रश्न विचारलं असता अधिकाऱ्याने मार्चपर्यंत असं उत्तर दिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “जर तुम्ही केले नाही तर कारवाई करणार. डोंगरे अधिकारी कोण आहे त्याला निलंबित करा, त्याला नाही केले तर तुम्हाला निलंबित करणार.
‘तुम्ही कशाला माझी इज्जत घालवता’
त्यादिवशी कॅबिनेट बैठकीत मला भुजबळ साहेब म्हणाले की हा रस्ता कृपया बनवा, तिथे पण मला उत्तर द्यावे लागले. हे डिपार्टमेंट कोणाकडे आहे तर माझ्याकडे, तुम्ही कशाला माझी इज्जत घालवता?,असा संताप त्यांनी बोलून दाखवला.
बैठकीत काळू धरण प्रकल्पातील विलंब, जमीन अधिग्रहणातील अडथळे, ठाणे-भिवंडी-कल्याण-पनवेलमधील वाहतूक कोंडी, भिवंडीला पाणीपुरवठ्याची कमतरता आणि STEM मधील भ्रष्टाचार यावर तक्रारी झाल्या. एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, कामे उशिरा होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि हलगर्जीपणासाठी सुनावलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही जुनी टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या ठेकेदारांवर टीका केली.
धरणाच्या विषयावरुनही झापलं
एकनाथ शिंदे यांनी बैठकीत ठाणे शहराकरता स्वतंत्र धरणाच्या विषयावरुनही झापलं. जमीन अधिग्रहण करता पैसे दिलेत मग काम का थांबले? फटाफट कामे करा. काळू धरणाकरता आम्ही किती वर्षे प्रयत्न करत आहोत. मग काम का धीम्या गतीने सुरु आहे. टाईमबॉन्ड घेवून काम पुर्ण करा असं एकनाथ शिंदे म्हणाले.
याचवेळेस मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सत्य परीस्थिती मांडली. पैसे दिल्याशिवाय जमिन अधिग्रहण केल्याशिवाय काहीही होणार नाही. बारवी धरणाचा आमचा अनुभव उराशी आहे. तर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील यांवर नाराजी व्यक्त करत सलग बैठका घेतल्या पाहिजेत आणि हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असं म्हटलं.