बीड जिल्ह्यातील मस्सोजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची अन्यायाविरुद्ध लढताना निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा विराज व पुतण्या सत्यजित देशमुख देखील ‘लढाऊ’ शिक्षण घेणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांना आठवी ते बारावीपर्यंत सैनिकी शाळेत मोफत शिक्षण मिळणार आहे.
विराज व सत्यजित आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची भेट घेतली. या भेटीत भावनिक संवाद घडून आला आणि त्यातून एक अत्यंत संवेदनशील व दूरदृष्टीचा निर्णय झाला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विराज आणि सत्यजित यांच्या आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, त्यांच्या दोघांचेही शिक्षण सांगली जिल्ह्यातील रेठरेधरण येथील नामांकित एस. के. इंटरनॅशनल सैनिकी शाळा इथं व्यवस्था केली आहे.
न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर लढा सुरू असतानाच, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने समाजात सकारात्मक उदाहरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आमदार अभिमन्यू पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते.
आजचे आंदोलन पुढं ढकललं
दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी, या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी देशमुख कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थं पुन्हा आज रस्त्यावर उतरणार होते.
कृष्णा आंधळे अद्याप फरार
ग्रामस्थांनी यासाठी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, 16 जून हा शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे आंदोलन 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आदी कोठडीत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
